Sunday, February 1, 2015

टपाल (Letter)

टपाल.....आजच्या मॉडर्न युगात दुर्मिळ होत चाललेली गोष्ट. टपाल हा शब्द ऐकल्यावर बरेचजण क्षणभर अवाक होऊन पाहतात आणि त्यावर प्रतिक्रिया असते कि, अरे!! बऱ्याच दिवसानंतर ऐकला रे हा शब्द. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे बऱ्याचजणांना हा शब्द ओळखीचा तरी वाटतो, नाहीतर आजच्या पिढीला टपाल म्हणजे काय हे माहित आहे कि नाही याबद्दल शंकाच आहे. आणि भविष्यात याच्याशी काही संबंध येण्याची शक्यताच नाही. कारण आजचे युग हे इंटरनेट युग आहे. एका सेकंदात हवी ती माहिती, हव्या त्या व्यक्तीपर्यंत इंटरनेटच्या माध्यमातून पोहोचवता येते. पहिल्यांदा टेलिफोन आला नंतर मोबाईल आणि आता व्हाट्स अॅप त्यामुळे आता टपालाची काही गरजच उरली नाही.

पण या सगळ्यामध्ये, सर्वांची सुख दु:खे घेऊन येणारा, ऊन पाऊस कश्याचीही पर्वा न करता, गावोगावी जाऊन टपाल पोहोचवणारा पोस्टमन कितीजणांना आठवतो?? आजकाल टपाल जसे दुर्मिळ होत चालले आहे तसेच पोस्टमन सुध्दा. लहानपणी एक खुप गमतीदार खेळ होता, ताईचं पत्र हरवलं.....सर्व मुले गोल घोळका करून बसायची आणि एक मुलगा हातात रुमाल घेऊन त्या घोळक्याच्या बाजूने धावायचा आणि बसलेली सर्व मुले एका सुरात मोठ्याने गायची "ताईचं पत्र हरवलं......." आणि तो धावणारा मुलगा म्हणायचा "तेच मला सापडलं.....". धावता धावता तो रुमाल नकळत कोणाच्यातरी पाठीमागे टाकायचा......ज्याच्या पाठीमागे तो रुमाल असायचा त्याने तो रुमाल उचलून त्या धावणाऱ्या मुलाला पकडण्याचा प्रयत्न करायचा. खूप मज्जा यायची. हळूहळू तो खेळही मागे पडत गेला आणि पत्रही!!

आज आयुष्याच्या खेळामध्ये असा काही अडकून गेलो आहे कि.....असे वाटते.....ताईचं पत्र खरोखरच हरवलय.....!!




याच विषयावर लक्ष्मण उतेकर यांचा खूप छान चित्रपट आहे "टपाल". प्रत्येकाने आवर्जून पाहावा असा हा चित्रपट आहे. खेडेगाव आणि एका पोस्टमनचे त्या खेडेगावाशी असलेले नाते, त्या गावातील लोकांच्या आयुष्यात पोस्टमनचे असणारे स्थान खुप सुंदरपणे या सिनेमात दाखवण्यात आले आहे.

गावातील एक लहान मुलगा रंगा, त्याने लिहिलेले टपाल आणि ते टपाल परत मिळवण्यासाठी पोस्टमनसोबतचा प्रवास........ त्यानिमित्ताने रंगाचा पोस्टमनच्या आयुष्यातील दोन दिवसांचा प्रवेश, पोस्टमनच्या आणि त्याच्या बायकोच्या आयुष्यात सुखांच्या फुलांची उधळण करणारा ठरतो. नंदू माधव यांनी आपल्या उत्तम अभिनयाने हुबेहूब पोस्टमन उभा केला आहे. वीणा जामकर आणि बालकलाकार रोहित उतेकर यांनी आपल्या सहजसुंदर अभिनयाने त्यांना तितकीच उत्तम साथ दिली आहे.


आपलं बालपण पुन्हा अनुभवण्यासाठी प्रत्येकाने हा चित्रपट जरूर पहा.....काय माहित, तुम्हाला तुमचं हरवलेलं "पत्र" पुन्हा सापडेल सुद्धा.....!!!!!







1 comment: